सेवा समाप्ती अन् कार्यालयीन भ्रष्टाचाराविरोधात न्यायाची मागणी
कंडारी येथील सुभेदार रामजी आंबेडकर विद्यालयाचे कनिष्ठ लिपिक महेंद्र पंढरीनाथ मेढे व त्यांच्या पत्नीने आपल्या सेवा समाप्ती निर्णयास विरोध करत आजपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
महेंद्र मेढे यांची सेवा कार्यालयीन भ्रष्टाचाराचे खोटे आरोप लावून समाप्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे सेवा समाप्तीचा आदेश रद्द करण्याची आणि थकीत वेतनासह व्याजाची भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२४ ते मे २४ आणि
सप्टेंबर २०२४ पासून आजपर्यंतचे थकीत वेतन १८% व्याजासह मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, मुख्याध्यापक राजेंद्र धनगर आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाईची मागणी ही त्यांनी केली आहे. तर पगारातून वसूल केलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीतील गैरव्यवहाराची चौकशी करावी, असा त्यांचा आग्रह आहे.
तर आरटीआय अंतर्गत माहिती न दिल्याबद्दल उपशिक्षणाधिकारी एजाज शेख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
२२ मार्च २०२२ पासून सुरू असलेल्या तक्रारींची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. सरकारने त्वरित दखल घेऊन न्याय्य देण्याची मागणी ही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट