भरधाव डंपरने कारला उडविले : विदगाव पुलावर भीषण अपघात |
जळगाव जिल्हा प्रतिनिधी,
बशिर तडवी,
भरधाव वेगाने धावणाऱ्या अवैध
वाळूच्या डंपरने कारला दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाले असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
जळगाव ते चोपड्याच्या दरम्यान असलेल्या तापी नदीवरील विदगाव पुलावर काल रात्री उशीरा भीषण अपघात घडला. यात यावल तालुक्यातील डांभुर्णी येथून जळगावकडे येत असलेल्या भरधाव वेगवान अशा डंपरने पुलावरच कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, यामुळे कार हवेसारखी उडून कठडे तोडत नदीपात्रातील वाळूवर पडली. या अपघातात चोपडा येथे जाणाऱ्या कुटुंबातील चौघांपैकी दोन जण ठार झाले असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातामध्ये विठ्ठल नगर येथील रहिवासी मीनाक्षी निलेश चौधरी वय 35) आणि त्यांचा मुलगा पार्थ वय 12) यांचा मृत्यू झाला आहे. तर निलेश प्रभाकर चौधरी वय) 36 आणि त्यांचा मुलगा ध्रुव वय) 4 हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. निलेश चौधरी हे धानोरा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांच्या मयत पत्नी मीनाक्षी चौधरी या जळगावत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. या भीषण अपघातामध्ये चौधरी कुटुंबावर काळाने घाला घातल्या असून यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस स्थानकाचे निरिक्षक संजय गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अवैध वाळू वाहून नेणाऱ्या डंपरमुळे आजवर जिल्ह्यात अनेकांचा बळी गेला असून आता विदगाव पुलावरील अपघातात दोघांना प्राण गमवावे लागले आहे. यामुळे बेकायदेशीर वाळू वाहतुकीला आळा घालण्याची मागणी आता होत आहे.
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट





