जळगाव जिल्हा प्रतिनिधी,
बशिर तडवी,
यावल शहरातील हनान खान यांच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेला धक्का देणाऱ्या या गंभीर घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. धनंजय भाऊ चौधरी यांनी तातडीने यावल पोलिस ठाण्यास भेट दिली.
यावेळी त्यांनी पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांची भेट घेऊन तपासाची सविस्तर माहिती जाणून घेतली व दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.
मा. धनंजय भाऊ चौधरी म्हणाले की –
“समाजात कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलिस प्रशासनाने तात्काळ व निर्णायक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून नागरिकांच्या मनात कायद्याबद्दल आदर निर्माण होईल व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसेल. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारांना पाठीशी घालणारी भूमिका सहन केली जाणार नाही.”
काँग्रेस पक्ष सदैव सामान्य जनतेसोबत खंबीरपणे उभा असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व पातळ्यांवर लढा देण्याचा निर्धार या वेळी धनंजय भाऊ चौधरी यांनी व्यक्त केला.